Pune Politics: देशात सलग तीन वेळा सत्तेत येऊनही विधानसभेच्या प्रचारासाठी चक्क गल्लीबोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा फिरत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुण्यात गुरुवारी केली.
खर्गे यांनी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी या वेळी शेतकर्यांच्या पीकमालाच्या हमीभाव, काँग्रेससह गांधी कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर भाजप कशी टीका करत आहे, यावर भाष्य केले.
मोदींनी स्टेडियमला स्वत:चे नाव दिले
तुम्ही केलेल्या विकासकामांवर न बोलता केवळ टीका करत आहेत. महागाई, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक उद्योग गुजरातला पळवित आहेत, त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. मुंबई, बंगळुरु आणि चेन्नईमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योजक उत्सुक आहेत. जिकडे तिकडे नेहरू आणि गांधींची नावे का दिली जातात, यावर मोदी बोलतात. परंतु जिवंत असताना देखील सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमला स्वत:चे नाव का दिले, असा आरोप खर्गे यांनी केला.
हमी भाव कधी देणार?
विदर्भ, मराठवाडा, नाशिकला सोयाबीन, कांदे आणि कापूस खरेदी निर्माण करण्याची लोकांची मागणी आहे. दहा वर्षे सत्तेत असूनदेखील हमीभाव कधी देणार हे सांगत नाहीत. आम्ही सत्तेत आलो की कापूस, सोयाबीन आणि शेतमालाला हमीभावापेक्षा त्यावरील दर देऊ. शेतकर्यांच्या मागण्यांवर काम करण्याऐवजी कर्नाटक- तेलंगणावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात.
ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकराची भीती
महाराष्ट्रात आमदारांना 50 खोके देत सत्ता स्थापन केली. भाजपप्रणित राज्यातील सरकार भ्रष्टाचारावर स्थापन झाले आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करत आहेत. केंद्रातील सरकार वाचविण्यासाठी नैतिक बळाचे खोटे दावे करत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तुरुंगात डांबले त्यांनाच सोबत घेऊन सत्ता स्थापन केली.
उद्घाटनाला जातात तेथेच गडबड होते
मोदी ज्या ठिकाणची उद्घाटने करतात तिथे काहीतरी गडबड होते. सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, राममंदिरात पाणी गळतेय, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना वगळून संसदेचे उद्घाटन स्वत: केले तिथे पण पाणी गळतेय. बुलेट ट्रेनचा पूलही पडला, पण 11 वर्षांत बुलेट ट्रेन आलीच नाही. आरक्षणाचे धोरण काँग्रेसने आणले, आता भाजप ते संपवायला निघालेत. ते देशाचे संविधान मानत नाहीत.
गांधी कुटुंबीयांचे बलिदान आठवा
देश एक राहावा यासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. तुमच्याकडे देशासाठी कोणी बलिदान केले, आम्ही देश एक ठेवण्यासाठी शहीद व्हायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
टीकेची पातळी घसरू दिली नाही
खर्गे म्हणाले, आजपर्यंतच्या अनेक विधानसभा निवडणुका मी पाहिल्या. परंतु, पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा गल्लीबोळात अन् घरोघरी फिरत असल्याचे चित्र पाहत आहे. विचारधारेविरोधात शिवीगाळ केली तर ठीक आहे. परंतु, लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा न करता गांधी घराण्याविरोधात खालच्या पातळीवर टीका करतात. आम्ही कधीही टीकेची पातळी घसरू दिली नाही. परंतु, मोदी हे गांधी कुटुंबाच्या विरोधात टीका करत आहेत. महाराष्ट्रात आणि झारखंडमधील निवडणुकात गांधी कुटुंबावरच टीका करत आहेत.