प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या गणितांना वेग आला आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा उपनगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्विकृत सदस्य निवडीकडे लागल्या आहेत. या पदांवर वर्णी लावण्यासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली असून, पक्षांतर्गत चुरस शिगेला पोहोचली आहे. एकूणच माळेगाव नगरपंचायतीत कुणाचे नशीब चमकणार हे गुरुवारी (दि. 15) समजणार आहे.
माळेगाव नगरपंचायत राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होत आहे. उपनगराध्यक्ष पद आणि स्विकृत सदस्य निवडीवरून सत्तेच्या सारीपाटावर वेगवेगळ्या सोंगट्या मांडून आडाखे बांधले जात आहेत. तर कार्यकर्त्यांमध्ये या निवडीबाबत प्रचंड उत्सूकता असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर गुलालाची उधळण कोणाच्या नावावर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निवडीच्या दिवशी नगरपंचायत परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
उपनगराध्यक्ष पद हे नगरपंचायतीमधील महत्त्वाचे सत्ताकेंद्र मानले जाते. सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवक या पदासाठी इच्छुक आहेत. विशेषतः ज्या प्रभागांतून मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून आले आहेत, त्यांनी या पदावर आपला दावा ठोकला आहे. श्रेष्ठींकडे भेटीगाठींचे सत्र वाढले असून यात कोणाची लॉटरी लागणार? याकडे माळेगावकरांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांचा सावध पवित्रा
उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवड ही केवळ पदे नसून, ती आगामी पाच वर्षांच्या सत्तेचे संतुलन राखण्याची गुरुकिल्ली आहे. यात चूक झाल्यास पक्षांतर्गत नाराजी ओढवून घेण्याची भीती असते. त्यामुळे वरिष्ठ नेते अतिशय सावध पावले उचलत असल्याचे चित्र असून यात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
स्वीकृत सदस्य: पडद्यामागून हालचाली
उपनगराध्यक्षसह स्वीकृत सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सूकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पदासाठी अनुभवी कार्यकर्त्यांना संधी मिळणार की एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला? निवडणुकीत पराभूत झालेल्या पण पक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या चेहऱ्याचे पुनर्वसन होणार का? सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सभेत दिलेला शब्द पाळला जाणार का? नवीन चेहऱ्याला संधी मिळणार? असे विविध चर्चांना सध्या उधाण आले आहे.