बारामती: माळेगाव बुद्रुक पोलिसांकडून माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे होत असलेला बालविवाह थांबवला. याप्रकरणी नियोजित नवरदेवासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन वधूचे वडील राजेश भोसले, आई वारणा भोसले (रा. माळेगाव खुर्द), नवरदेव राहुल शिंदे, नवरदेवाचे वडील भानुदास शिंदे, नवरदेवाची आई रूपाली शिंदे (तिघे रा. पिंपरी, ता. खंडाळा) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
माळेगाव खुर्दमध्ये रविवारी (दि. 20) एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांना मिळाली. विवाहासाठी वराचे वय 21 तर वधूचे वय 18 वर्षे असावे लागते. तरीही माळेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या यशवंत सभागृहामध्ये ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता हा विवाह केला जात होता.
लोखंडे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलिस पथकाला घटनास्थळी पाठवून सत्यता पडताळत कारवाईची सूचना दिली. त्यानुसार हे पथक विवाहस्थळी दाखल झाले. त्यांनी वर आणि वधू यांच्या वयाची सत्यता तपासली असता वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा बालविवाह थांबवत नवरदेवाची वरात थेट पोलिस ठाण्यात आणण्यात आली. ग्रामविकास अधिकारी इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी याप्रकरणी शासनाकडून फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.