पुणे

अतिवृष्टीने बाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे प्रशासनास निर्देश

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम करावे, असे सांगत येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील नुकसानग्रस्त काही भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे अधिकार्‍यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीतून केल्या.  अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पशुधनावरील 'लम्पी' आजार व 'आनंदाचा शिधा' कीट वाटपाचा आढावा ना. विखे पा. यांनी शिर्डी येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अ.नगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. शिर्डी येथून अप्पर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांची माहिती सांगितली.
पालकमंत्री विखे पा. म्हणाले, जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसापेक्षा सर्वाधिक पाऊस ऑक्टोबर महिन्यात झाला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेवगाव, जामखेड, राहुरी, नेवासा, कोपरगाव या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र प्रभावित झाले. सोयाबीन पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. प्रशासनाने सरसकट 100 टक्के पंचनामे करण्याचे काम करावे. दिवाळी असताना मी स्वत: काही तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहे. यावेळी पशुसंवर्धन अधिकार्‍यांपासून तहसीलदार, गट विकास अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक आदी तालुका शासकीय यंत्रणेने उपस्थित राहावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पशुधनावरील 'लम्पी' चर्मरोग आजारात पशुधनाचा मृत्यूदर वाढत आहे. सर्व तहसीलदारांनी यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. 'लम्पी'लसीकरण व जिल्ह्यात उपलब्ध औषधांचा प्रशासनाने आढावा घ्यावा, अशा सूचना यावेळी महसूलमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

शासनाच्या 'आनंदाचा शिधा' या किट वाटपाचा आढावा घेत ना. विखे पा. म्हणाले, जिल्ह्यात 4 लाख 90 हजार 685 आनंदाचा शिधा किट प्राप्त आहेत. हे किट दिवाळीपूर्वी गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत. यासाठी प्रशासनाने कामात अधिक सुसूत्रता आणत प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महसूल मंत्री विखे पा. यांनी यावेळी केल्या.

सोयाबीन पिकांचे 100 टक्के नुकसान
शेवगाव, जामखेड, राहुरी, नेवासा, कोपरगाव या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र प्रभावित झाले. सोयाबीन पिकांचे 100 टक्के नुकसान झाले. प्रशासनाने सरसकट 100 टक्के पंचनामे करण्याचे काम करावे. दिवाळी असताना मी स्वत: काही तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार असल्याचे महसूल मंत्री विखे पा. म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT