पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या आगमनानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. सूर्याच्या वाढत्या तेजाप्रमाणे तुमचे तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो, अशा एकमेकांना शुभेच्छा व तिळगूळ देत रविवारी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. विवाहित महिलांनी एकमेकींना वाण दिले. तर लहान मुले, तरुणांनी पतंगबाजीचा आनंद लुटला.
मकरसंक्रांतीनिमित्त घराघरांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी पूजाअर्चा केली. खासकरून सूर्यदेवतेची आराधना करण्यात आली. सगळीकडे सुख-समृद्धी, धनसंपदा आणि मांगल्य नांदो, अशी कामनाही करण्यात आली. घरोघरी पुरणपोळीसह पंचपक्वानाचा एकत्रितपणे आनंद घेतला. तिळगूळ वड्या, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या आणि हलवा देऊन कुटुंबीयांनी, नातेवाइकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने ठिकठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावा पार पडला.
सोशल मीडियावर धूम…
खासकरून महिला-तरुणींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. एकमेकांसोबत छायाचित्र अन् सेल्फी टिपत ते सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. बाहेरगावी राहणार्या आप्तेष्टांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा आल्या. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वट आणि इन्स्टाग्रामवरूनही एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. काही ठिकाणी बोरन्हाण करण्यात आले. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनीही संक्रात आनंदात साजरी केली. काही संस्था-संघटनांकडून सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
पंतगबाजांमध्ये उत्साह…
संक्रांतीच्या निमित्ताने सकाळपासूनच लहान मुलांसह तरुणांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. डेक्कन परिसर, कॅम्प परिसर, कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर आदी ठिकाणी पतंग उडविताना लहान मुले अन् तरुणाई पाहायला मिळाले. रंगबिरंगी पतंग आकाशात झेप घेत होत्या अन् काही जणांनी सहकुटुंब पतंग उडविण्याचा आनंद घेतला. नायलॉन मांजा वापरू नका, अनेक संस्थांनी जनजागृतीपर उपक्रम राबविले.
मंदिरांमध्ये रांगा…
सणाच्या निमित्ताने मंदिरांमध्ये फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाईही केली होती. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी रांग लागल्याचे पाहायला मिळाले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागीरदार, उत्सवप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे आदी उपस्थित होते. रेखा गाडगीळ यांनी श्री दत्तमहाराजांसाठी हलव्याचे दागिने साकारले. काशी येथील पं. वेदमूर्ती गणेश्वर द्रविडशास्त्री यांच्या हस्ते माध्यान्ह आरती झाली. सुभाष सरपाले यांनी ही आरास केली.
दत्तमहाराजांना 125 किलो तिळगूळ
तिळगूळ, गूळ पोळी, तीळ वडी, पापडी, गूळ-मोदकाच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर… हलव्याचा नयनरम्य तन्मणी, मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार घातल्यानंतर दिसणारी श्री दत्त महाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरिता श्री दत्तमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे श्री दत्त महाराजांना 125 किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.