खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील डब्ल्यूओएम कंपनीसमोर बुधवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात दोन कंटेनर, एक पीकअप आणि तीन दुचाकींचा समावेश असून चार जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारा एक कंटेनर ससेवाडी उड्डाण पुलावर आला. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कंटेनर विरुद्ध लेनमध्ये म्हणजेच पुणेहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाऊन आदळला. या अनियंत्रित कंटेनरने पुढील एक कंटेनर, एक पीकअप आणि तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. (Latest Pune News)
अपघातात चार जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने डब्ल्यू ओ एम या कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, अपघात घडून सुमारे अर्धा तास उलटल्यानंतरही राजगड पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. पोलिसांच्या या दिरंगाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नंतर हळूहळू सुरळीत करण्यात आली.