बिल्डर विठ्ठल पोळेकर खून प्रकरण Pudhari
पुणे

बिल्डर विठ्ठल पोळेकर खून प्रकरण : मुख्य सूत्रधाराला कोल्हापुरातून बेड्या

दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण

पुढारी वृत्तसेवा

सिंहगड पायथा परिसरातून शासकीय ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचा दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून खून झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूरातून बेड्या ठोकल्या, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावातील पोळेकरवाडीत विठ्ठल सखाराम पोळेकर (वय 70) राहायला होते. आरोपी योगेश भामे डोणजे परिसरात राहायला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याने पोळेकर यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 14 नोव्हेंबर 2024 रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे मोटारीतून अपहरण केले. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते.

या प्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (वय 24, रा. चिंचली गुरव, जि. अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात ( वय 24, र. बेलगाव, अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. गेले दोन महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. भामे कोल्हापुरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गुंड योगेश भामे गेले दोन महिने फरारी होता. त्याला आश्रय देणारे, तसेच आर्थिक मदत करणार्‍यांना सहआरोपी करण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सागर पवार, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय सुलनासे, रामदास बाबर, राजू मोमीन, अतुल डेरे, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT