महाराष्ट्रात महायुतीने आधी करून दाखवले आणि नंतर सांगितले. त्यामुळे महायुतीसाठी राज्यात वातावरण चांगले असून, पुन्हा येथे महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रभारी तथा कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांनी व्यक्त केला.
बारामतीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक रवी यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोरे, प्रदीप गारटकर, नवनाथ पडळकर, सतीश फाळके, पी. के. जगताप, सुजित वायसे, आकाश कांबळे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
रवी म्हणाले, महाराष्ट्रातील ही निवडणूक खोटी गॅरंटी विरुद्ध पक्की गॅरंटी अशी आहे. आम्ही रिपोर्ट कार्डवर मते मागत आहोत. काँग्रेस आघाडी खोटी आश्वासने देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत काँग्रेसने हरवले होते. त्यांनीच लोकसभेवेळी संविधान बदलले जाणार, असा खोटा प्रचार केला.
राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे तिन्ही महत्त्वाचे नेते जनतेशी जोडले गेले आहेत, त्यामुळे स्पष्ट बहुमताने आम्ही सत्तेत येऊ. राष्ट्रासोबत महाराष्ट्र पुढे जाईल. बारामतीत अजित पवार यांनी विकास केला असून, ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.
पुणे जिल्ह्यातील पुरंदरसह राज्यात तीन-चार ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. इतर ठिकाणी आम्ही महायुती म्हणून सामोरे जात आहोत. जागा कोणाकडेही असो, महायुतीसाठी भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते प्रामाणिक काम करतील, असे रवी म्हणाले.