पुणे : ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून ते मुंबई महापालिकेपर्यंत सत्ता महायुतीचीच येणार आहे. एकनाथ शिंदे यांचे नाणे खणखणीत असल्यानेच तीन वर्षांपूर्वी उठाव झाला आणि विधानसभा निवडणुकीत सिद्धही झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती एकत्र येऊनच लढवणार आहे, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. (Pune Latest News)
शिवसेना (शिंदे गट) पुणे शहर पदाधिकार्यांची बैठक बुधवारी मध्यवर्ती कार्यालयात झाली. त्यानंतर सामंत माध्यमांशी बोलत होते. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख रवींद्र धंगेकर, प्रमोद भानगिरे, रमेश कोंडे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतून नेते व कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. त्यांना पद देण्यासाठी आम्ही आलो आहोत, कोणाचे पद काढून घेण्यासाठी नाही. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने स्वबळाचा नारा दिला तरी काही गैर नाही. मात्र, राज्यात या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रच लढणार आहेत. त्याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील.
“आमची तयारी पूर्ण झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. लोक त्यांना स्वीकारत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीला फटका बसणार नाही, उलट ते स्वतःच संपतील, अशी टीका सामंत यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ ठोस कारण असल्यासच बैठकांना गैरहजर राहतात. पुणेकर असल्याने तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना घशाचा आजार असल्यानेच ते शासकीय बैठकींना अनुपस्थित राहतात. त्यांच्या सर्व दौरेही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या बाबतीत इतर चर्चा करण्याची गरज नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत पक्ष कार्यालयातील एका खोलीत बसले असताना मोठी गर्दी झाली. त्यामुळे काहींना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर बाहेर पडलेल्या पदाधिकार्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.