Maharashtra Assembly Election: कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. पाटील यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.
आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि तिसर्या परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच खर्या आर्थाने मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बाणेर, सूस, म्हाळुंगे, जय भवानीनगर, केळेवाडी, कोथरूड गावठाण, शिवतीर्थनगर, भुसारी कॉलनी, बावधन खु., आयडियल कॉलनी, महात्मा सोसायटी, कर्वेनगर अशा उच्चभ्रू, मध्यम आणि झोपडपट्ट्यांचा समावेश असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.
संमिश्र मतदारांचा समावेश असतानाही महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप वगळत सर्वच पक्षांची दाणादाण उडाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काही थोडेफार यश मिळाले होते. मात्र, मनसेला खातेही उघडता आले नव्हते. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत कोथरूडकरांनी भाजप उमेदवार गिरीश बापट यांना तब्बल एक लाख 48 हजार 570 मतांची आघाडी दिली होती.
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कट करत भाजपने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली. त्यामुळे प्रा. कुलकर्णी यांच्यासह मतदारसंघातील ब्राम्हण समाजाने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
त्यातच सर्व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला होता. पुण्याबाहेरचा उमेदवार, पक्षातील नेत्यांची नाराजी आणि विरोधकांची एकजूट, यामुळे लोकसभेच्या मताधिक्यामध्ये घट होऊन चंद्रकांत पाटील यांना केवळ 25 हजार 495 मतांच्या फरकाने विजय मिळाला.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघ चांगल्या प्रकारे बांधला आहे. मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडींवर लक्ष देण्यासोबत त्यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, बदलती राजकीय स्थिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे झालेले दोन तुकडे, महागाई, संविधान बदलण्याचा आरोप, या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना कोथरूडकरांनी 71 हजारांचे मताधिक्य दिले.
आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाला जागा सोडण्याच्या सूत्रानुसार कोथरूडची जागा महायुतीमध्ये भाजपकडेच राहणार आहे. तर, महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे राहणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. केवळ त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याची चर्चा आहे.
मात्र, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार इच्छुक आहेत. शिवसेना या दोघांपैकी कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
याशिवाय मनसेकडून माजी नगरसेवक अॅड. किशोर शिंदे, हेमंत संभुस, सुधीर धावडे आणि राम बोरकर इच्छुक आहेत. परिवर्तन महाशक्ती कोणाला उमेदवारी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असे असले तरी सर्व उमेदवार जाहीर झाल्यानंतर येथील लढाई दुरंगी होणार, तिरंगी होणार की चौरंगी होणार, हे स्पष्ट होणार आहे.
पाटील यांच्यासह मोहोळ,प्रा. कुलकर्णींची प्रतिष्ठा पणाला
गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेने या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे कोथरूडच्या निवडणुकीत पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि प्रा. कुलकर्णी यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
प्रचारात हे मुद्दे ठरणार प्रभावी
हिंदुत्व
राजकीय पक्षांची तोडफोड व बदलते मित्रपक्ष
कोथरूड शिवसृष्टी
वाहतूक कोंडी
सोसायट्या व झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास
सार्वजनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या
बीडीपी
पदपथांवरील अतिक्रमण
पाषाण तलावाची दुर्दशा
कचरा प्रकल्प स्थलांतर
मतदारसंघातील
गुन्हेगारी व सामाजिक
सुरक्षितता
अमोल बालवडकर काय करणार?
विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये सोबत असलेली ठाकरेंची शिवसेना या वेळी भाजपसोबत नसली तरी अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आहे. तसेच, प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने मागील निवडणुकीत नाराज असणारा ब्राम्हण समाज आणि मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने मुळशीकर भाजपवर खूष दिसतो. असे असले तरी भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढविण्यासाठी दंड थोपटले आहे. यादृष्टीने त्यांनी जोरदार तयारी केली असून, त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठांकडून सुरू आहेत. आता ते माघार घेणार की बंडखोरी करणार, हे पाहावे लागणार आहे.