वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महावितरण आता व्यावसायिक वीज बिल आकारणार file photo
पुणे

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महावितरण आता व्यावसायिक वीज बिल आकारणार

ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनही भरावे लागणार बिल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सर्वसामान्य वीजग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. वर्क फ्रॉम होम करणार्‍यापासून सर्व घटकांना व्यावसायिक (कमर्शिअल) वीज बिल आकारण्यात येणार आहे. त्याविरोधात सौरऊर्जा क्षेत्रात काम करणार्‍या संस्था आणि संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, अशी माहिती द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयेश अकोले यांनी दिली.

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा)च्या वतीने प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात पुण्यातील पत्रकार भवनमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्या वेळी अकोले यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा)चे अध्यक्ष शशिकांत वाकडे हे उपस्थित होते.

अकोले म्हणाले, केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरावर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, त्याला पूर्णपणे हरताळ फासण्याचे काम महावितरण करत आहे. त्यामुळे या योजनेचा कोणताही फायदा होणार नाही.

पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार असल्याबरोबर आपल्या व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणने अनेक जुलमी नियम, अटी बनविण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

तयार झालेल्या वीज युनिटचा हिशोब ठेवणार्‍या नेटमीटरसाठी टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर देऊन त्याच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी, त्यांचे वीजबिल शून्य न होता, नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे सूर्यघर योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम या टीओडी मीटरच्या माध्यमातून होणार आहे.

टीओडी मीटरमुळे ग्राहकांना होणारे तोटे

  • रुफटॉप रेग्युलेशन्स 2019 नुसार टीओडी मीटर असलेल्या ग्राहकाना दिवसा अर्थात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात (ऑफ पीक) तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे.

  • योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या युनिटची भरपाई (दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही.

  • सौर यंत्रणेमधून वीज दिवसा तयार होते. तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या टीओडी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही.

  • महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सौर वीज त्याच काळात न वापरल्यास ती ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील.

  • वर्षाअखेर तेवढ्याच युनिटपोटी महावितरणकडून तीन ते साडेतीन रुपयांप्रमाणे पैसे मिळतील. दरम्यान, ग्राहकांनी संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या मुख्य वेळेत वापरलेल्या विजेसाठी त्याला बिल भरावेच लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT