पुणे

नवी सांगवी : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग

अमृता चौगुले

नवी सांगवी; पुढारी वृत्तसेवा : येथील कृष्णा चौकात असणार्‍या राधा-रमण सहकारी गृहरचना सोसायटीच्या इमारतीला लागून असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. ही आग सोमवारी पहाटेच्या सुमारास सकाळी पाऊणेसहा वाजता लागली. याबाबत माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. अन्यथा अनर्थ घडून आला असता.

डीपीमधील वीजपुरवठा केला बंद

आग लागल्याची घटना स्थानिक रहिवासी विशाल क्षीरसागर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरित महावितरण कार्यालयात फोनद्वारे संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच काही वेळातच महावितरणचे कर्मचारी संतोष सर्जे, निलेश सूर्यवंशी, सागर बुरडे घटनास्थळी दाखल झाले. या वेळी कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान ओळखून ट्रान्सफॉर्मरला लागून असलेल्या डीपीमधील वीजपुरवठा तत्काळ बंद केला.

सोमवारी पहाटेच्या सुमारास सकाळी पावणेसहाच्या दरम्यान महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. या वेळी आगीच्या ठिणग्या उडून जमिनीवर खाली पडत होत्या. सर्व परिस्थिती लक्षात घेता महावितरण कर्मचार्‍यांनी त्वरित क्षणाचाही विलंब न लावता प्रथमत: डीपी बंद करून बाजूची वाळू घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पहाटेची वेळ असल्यामुळे नागरिक गाढ झोपेत होते. या वेळी घटनास्थळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सोमवारी सकाळी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मी कृष्णा चौकात चहा पिण्यासाठी गेलो असता मला तिथे एमएसईबीच्या ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. या वेळी महावितरण विभागाला संपर्क करून कळवले. काही वेळातच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडून आला असता.

– विशाल क्षीरसागर, कार्याध्यक्ष पोलिस फ्रेंड्स असोसिएशन

या सोसायटीला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळ दर दोन, तीन आठवड्यातून स्पार्क होऊन आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. या ठिकाणी कायम परिसराला धोका निर्माण होत आहे. महावितरणने याकडे दुर्लक्ष न करता कायमस्वरूपी ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करावी. याचा नाहक त्रास सोसायटीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

– अ‍ॅड. सुदाम मराडे, स्थानिक रहिवासी

या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जवळ 22 केव्ही एचपीचा ओडी आहे. पावसामुळे पाणी जाऊन शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे केबल जळाली. या वेळी फिडर बंद करण्यात आला. या वेळी इतर सप्लाय पूर्ववत करण्यात आला. सध्या केबल जळालेला भाग कट करून त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. केबल जोडण्याचे काम सुरू आहे. काही वेळातच सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत होईल.

– रत्नदीप काळे, सहायक अभियंता, सांगवी महावितरण

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT