प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शासनातर्फे सर्वांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत खूप कमी रुग्णालयांचा समावेश असल्याने लाभ मिळवताना खूप अडचणी येत आहेत.
या योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांची संख्या 82 झाली असून, त्यामध्ये केवळ 15 ते 16 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. शासन आयुष्मान कार्ड काढून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे.
मात्र, कार्ड चालेल अशी रुग्णालयेच अपुरी असल्याने रुग्णांनी उपचार कोठे घ्यायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे खासगी रुग्णालयांचे जाळे वाढत असताना तिथे सामान्यांना शासकीय योजनेंतर्गत उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आरोग्य हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
महात्मा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत उत्पन्न आणि रेशन कार्डाची मर्यादा होती. आता जिल्ह्यातील कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकाला योजनेचा लाभ घेता येणे शक्य आहे. आयुष्मान भारत कार्ड काढलेले असल्यास आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्यास रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहेत. मात्र, शहरातील महत्त्वाच्या रुग्णालयांचा यामध्ये कधी समावेश होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
योजनेचा काहीच उपयोग नाही
शासनाने मागील वर्षी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या आजारांची यादी प्रसिद्ध केली. महात्मा फुले योजनेमध्ये 996 प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत उपचारांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1350 आजार समाविष्ट असून, यामध्ये साडेतीन लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. मात्र, अधिकाधिक रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, तर योजनेचा काहीच उपयोग नाही, अशा प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहेत.