एकनाथ शिंदे 
पुणे

पिंपरी : महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेचा पुरस्कार केला : मुख्यमंत्री शिंदे

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महात्मा बसवेश्वर यांचा केवळ पुतळा नसून तो सर्वांसाठी प्रेरणा आणि ऊर्जेचे स्थान आहे. श्रम हिच पूजा आणि श्रमाधारित व्यवस्था हिच त्यांची शिकवण होती. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुता यांचा पुरस्कार केला. त्यांनी बाराव्या शतकात समाजातील अनिष्ठ रूढी परंपरेविरोधी बंड पुकारले होते, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 16) निगडी येथे व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे, उपाध्यक्ष बसवलिंग कुल्लोळी, सचिव बसवलिंग कनजे, सिध्दरामेश्वर नावदगेरे, चंद्रकांत खोचरे, डॉ. अशोक नगरकर, सुरेश लिंगायत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. तर याच वर्षी आपण महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करत आहे. या अमृत महोत्सवी वर्षात असे मोठमोठे योग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देवाला म्हणजे शिवाशी एकरूप होण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. असा मंत्र बसवेश्वरांनी दिलेला आहे. परदेशातही त्यांच्या तत्वज्ञानाचा आदर केला जातो. त्यामुळे इंग्लडमध्ये त्यांचा पुतळा उभारला आहे.

लिंगायत समाजाच्या समस्या सोडविणार

लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात जागा आरक्षित करण्यात येणार आहे. इतर महापुरुषांच्या जयंतीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात यावी. लिंगायत समाजाला जातीचा दाखला मिळताना होणार्‍या अडचणी दूर केल्या जातील. त्याशिवाय लिंगायत समाजाच्या सर्व समस्या सोडवून, सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मी देखील शब्द पाळला

लिंगायत समाजातील अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी काम करतात. ते प्रामाणिक आहेत. दिलेला शब्द पाळतात. त्याचप्रमाणे मी देखील दिलेला शब्द पाळला आणि 11 महिन्यांपूर्वी सरकार पाडले, अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मारली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT