Maharashtra Women Investors | शेअर गुंतवणुकीत महाराष्ट्रातील महिला देशात अव्वल 
पुणे

Maharashtra Women Investors | शेअर गुंतवणुकीत महाराष्ट्रातील महिला देशात अव्वल

एनएसई : देशातील एकूण गुंतवणूकदारांपैकी २५ टक्के महिला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : देशातील शेअर बाजारातील एकूण गुंतवणूकदारांमधील महिलांचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे. देशातील महिला गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) एप्रिल आणि मे २०२६ च्या मार्केट पल्स रिपोर्टस्‌नुसार २०२६ मध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२३ पासून महिला गुंतवणूकदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांमध्ये महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मिझोराम, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमधील एकूण गुंतवणूकदारांपैकी महिला गुंतवणूकदारांचा वाटा २९ टक्क्यांहून अधिक आहे. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, येथे एकूण गुंतवणूकदारांपैकी २९ टक्के महिला आहेत. राज्यात एकूण गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने महाराष्ट्रातील महिलांची संख्याही सर्वाधिक होते.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण २८.७ टक्के आहे. कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्येही महिला गुंतवणूकदारांचा वाटा २७ टक्क्यांपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे. याउलट उत्तर प्रदेशमध्ये महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण १९.१ टक्के असून, बिहारमध्ये ते केवळ १६.५ टक्के आहे. उत्तर प्रदेश हा गुंतवणूकदारांच्या संख्येनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असले, तरी महिलांचा सहभाग अद्याप मर्यादित असल्याचे दिसून येते.

असा आहे गुंतवणूकदारांचा कल

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कॅश इक्विटी (शेअर), म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हे प्रमुख पर्याय असल्याचे एनएसईने स्पष्ट केले आहे. दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिला या माध्यमांचा वापर करीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आर्थिक साक्षरतेमुळे वाढला टक्का

गुंतवणुकीची सुलभ प्रक्रिया, आर्थिक साक्षरतेत झालेली वाढ, महिलांचे वाढलेले उत्पन्‍न, बाजार पेठेपर्यंत सहज पोहोच, तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीत आलेली सुलभता, यामुळे महिलांचा कल गुंतवणुकीकडे वाढत असल्याचे निरीक्षण एनएसईने नोंदविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT