पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
राज्य नाट्य स्पर्धा शनिवार (दि. 1) जानेवारी, 2022 पासून सुरू होणार होती. ही स्पर्धा पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरू होईल.
तसेच, प्रवेशिका दाखल करण्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार स्पर्धकांना 15 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील.
अनेक रंगकर्मींनी आणि संस्थांनी प्रवेशिका दाखल करण्याची व सादरीकरणाची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती.
या मागणीचा विचार करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
या पूर्वी प्रवेशिका भरण्याची मुदतसुद्धा 30 नोव्हेंबर तर, स्पर्धेला सुरुवात 1 जानेवारीपासून होणार होती. अखेर या दोन्ही गोष्टींना मुदतवाढ देण्यात आली आहे.
नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करताना कोविडविषयक नियमांचे पालन अनिवार्य असेल, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
प्रवेशिका व नियम संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.