पुणे: राज्यात स्मार्ट मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहक तसेच वीज वितरण कंपनी या दोघांनाही अनेक महत्त्वाचे फायदे होणार असल्याचे मत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले आहे.
स्मार्ट मीटरमध्ये सीमकार्ड आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे वीजवापराचे रीडिंग थेट व अचूकपणे वीज कंपनीकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मीटर रीडिंगमधील मानवी चुका मोठ्या प्रमाणात कमी होतील. आजपर्यंत अनेक ठिकाणी चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांना अवाजवी बिले, बिल दुरुस्तीची प्रक्रिया व विविध तक्रारींना सामोरे जावे लागत होते.
स्मार्ट मीटरमुळे या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट मीटर ही आधुनिक व उपयुक्त तंत्रज्ञान प्रणाली असली तरी त्याच्या अंमलबजावणीमुळे सध्या कार्यरत असलेल्या मीटर रीडर, वसुली कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर कर्मचार्यांच्या रोजगारावर किंवा सेवाशर्तींवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये. तंत्रज्ञानाचा वापर हा कामगारांचे हित, रोजगार सुरक्षा व कौशल्यवृद्धी यांच्यासोबत समन्वय साधून करण्यात यावा, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
स्मार्ट मीटरचे असे आहेत फायदे
वीजवापराचे रीडिंग थेट व अचूकपणे कंपनीकडे पोहोचेल. बिलांमधील त्रुटी, चुकीचे रीडिंग व अंदाजे बिलांची समस्या कमी होईल.
ग्राहकांना बिलदुरुस्तीसाठी वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत.
अवाजवी किंवा नादुरुस्त बिले मिळण्याचे प्रमाण कमी होईल. ग्राहक घरी नसला किंवा मीटर बंदिस्त जागेत असला तरी रीडिंग सहज उपलब्ध होईल.
ग्राहकांच्या तक्रारींमध्ये घट होऊन सेवा अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनेल.वीज वितरण कंपनीची महसूल वसुली प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल.
वसुलीच्या वेळी ग्राहक व कर्मचार्यांमध्ये होणारे वाद, तणाव व अप्रिय घटना कमी होतील.
वीज कर्मचार्यांवर किंवा वसुली कर्मचार्यांवर होणार्या मारहाणीच्या घटनांमध्येही घट होण्यास मदत होईल.