सुनील जगताप
पुणे : राज्याच्या क्रीडा विभागामार्फत शालेय क्रीडा स्पर्धा दर वर्षी भरविल्या जातात. या क्रीडा स्पर्धांमध्ये जास्त वयाच्या खेळाडू स्पर्धेत उतरून खर्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. त्यामुळे वयचोरीचा फटका शालेय क्रीडा स्पर्धांनाही बसत असून, त्यावर आता राज्याचा क्रीडा विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. स्पर्धेत उतरण्यापूर्वी वयपडताळणी चाचणी अनिवार्य केल्याचे आदेश विभागाने काढलेले आहेत. (Pune Latest News)
क्रीडा विभागामार्फत तसेच महाराष्ट्रातील क्रीडा संघटनांमार्फत आयोजित करण्यात येणार्या किंवा निरीक्षणाखाली पार पडणार्या शालेय कुस्ती क्रीडा व संघटना माध्यमातून घेण्यात येणार्या 14, 15 आणि 17 वर्षांखालील कुस्ती स्पर्धांमध्ये काही खेळाडू खोटे वय दाखवून स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत. राज्यात पुण्यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धांमध्ये खरे वय लपवून कमी वय दाखविणारे बनावट किंवा चुकीचे प्रमाणपत्र वापरून स्पर्धेमध्ये सहभाग घेत खेळले गेल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
अशा काही खेळाडूंवर स्पर्धेदरम्यान आक्षेप नोंदविल्यानंतर संबंधित खेळाडू खोट्या वयाचे मूळ जन्मदाखले, आधार कार्ड, शाळेचे दाखले, इतर कागदपत्रांचे प्रमाणपत्र हे दाखवतात व यामधून आपली सुटका करवून घेतात. संबंधित खेळाडूचे वय 5 वर्षांपर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला किंवा खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्य प्रत, आधार कार्ड किंवा पासपोर्ट ही कागदपत्रे अनिवार्य करण्याबाबत आदेश दिले होते. अद्यापही काही खेळाडू बोगस कागदपत्रांच्या आधारे वय कमी करून शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याच्या तक्रारी क्रीडा विभागाला प्राप्त झाल्या. त्यामुळे क्रीडा विभागाने आता वय पडताळणी चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामध्ये संबंधित खेळाडूचे वय किमान 5 वर्षांपर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला, खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्य प्रत आणि आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक केले आहे.
शालेय व संघटनांमार्फत घेण्यात येणार्या कुस्ती स्पर्धांमध्ये संशयित व बनावट वयाची कागदपत्रे बनविणार्या डमी खेळाडूंची संख्या वाढत चाललेली आहे. त्याबाबत क्रीडा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. याची दखल क्रीडा विभागाने घेतली असून, तसे आदेशही काढलेले आहेत. या आदेशाची तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रशासकीय अधिकार्यांनी कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.- पै. निकुंज दत्तात्रय उभे, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक आणि प्रवक्ता, कुस्ती मल्लविद्या