Tamhini Ghat Pudhari
पुणे

Sahyadri Rainfall: अल निनोच्या प्रभावातही सह्याद्रीची पावसात बाजी!; ताम्हिणी घाटात ८ हजार ४२ मिमी, भिरात ८,७८२ मिमी पाऊस

मौसिनराम-चेरापुंजीला टाकले मागे; अवघ्या ५५ दिवसांत ताम्हिणीत ८ हजार मिमीचा टप्पा, मजबूत मोसमी वाऱ्यांचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

­पुणे: यंदाच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्याने अल निनोच्या प्रभावातही देशात सर्वाधिक पावसाचा विक्रम नोंदवला आहे. देशात नेहमी आघाडीवर असणाऱ्या मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजीला खूप मागे टाकले आहे. रायगड जिल्ह्यातील भिरामध्ये ८ हजार ७८२ तर पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात ८ हजार ४२ मि.मी.ची नोंद झाली आहे.

ताम्हिणी घाटात जूनमध्ये ३६९ मि.मी., जुलैमध्ये तब्बल ५,७१० मि.मी. पाऊस झाला. ऑगस्टच्या पहिल्या १७ दिवसांत आणखी १,९६२ मि.मी.ची भर पडली. अवघ्या ५५ दिवसांत ८ हजार मि.मी.चा टप्पा गाठणे ही यंदाच्या मान्सूनची अत्यंत उल्लेखनीय घटना ठरली आहे. महाबळेश्वरनेही विक्रमी पावसाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे महाबळेश्वर, ताम्हिणी, भिरा, लोणावळा-खंडाळा आणि सह्याद्रीच्या इतर घाटभागांत पावसाची तीव्रता मैदानी भागापेक्षा कितीतरी अधिक राहिली आहे.

का पडला इतका पाऊस?

  • अरबी समुद्राकडून येणारे दमट नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या उंच भिंतीला धडकतात आणि त्यातून मोठा पाऊस मिळतो. यंदा हे वारे अत्यंत मजबूत आणि हवेचे दाब अनुकूल झाले.

  • त्यामुळे घाटाच्या पश्चिम उतारावर मुसळधार पाऊस, तर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पुण्यासारख्या पूर्वेकडील भागात तुलनेने कमी पाऊस असे चित्र दिसते.

  • तुलनेसाठी चेरापुंजीचा दीर्घकालीन जून-ऑगस्ट सरासरी पाऊस सुमारे २,९१५ मि.मी. आहे, तर मौसिनराममध्ये ऑगस्टचीच सरासरी सुमारे १,०२२ मि.मी. आहे.

  • मात्र ऑगस्टअखेर या दोन्ही ठिकाणी यंदा फक्त ६ हजार ३०० ते ६ हजार ७०० मि.मी.पर्यंत झाला आहे. तेथे सुमारे ५८ टक्के कमी पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT