Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत उपाध्यक्ष-विश्वस्त निवड पुढे ढकलली

नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत निर्णय पुढे; 40 दिवसांत अंतिम निवड अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्याच महत्त्वपूर्ण बैठकीत उपाध्यक्ष आणि विश्वस्तपदाच्या निवडीदरम्यान काही जुनीच नावे पुढे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या पदांच्या निवडीबाबत अधिक व्यापक चर्चा व्हावी, नव्या नावांनाही संधी मिळावी, यासाठी उपाध्यक्ष आणि विश्वस्तपदाच्या निवडीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. पुढील 40 दिवसांत पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी गुरुवारी (दि.16) पत्रकार परिषदेत दिली.

मसापच्या कार्यकारिणी बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्याचीच माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 31 पैकी 28 सदस्य उपस्थित होते. सकारात्मक वातावरणात ही बैठक पार पडली असून, सर्व निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

मसाप पत्रिकेच्या संपादकपदी सुरेश देशपांडे यांची फेरनिवड केली, तर जयंतराव येलूरकर (अहिल्यानगर) आणि संजीव गिरासे (धुळे) यांची विभागीय कार्यवाह म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या प्रतिनिधींनी कोणताही विरोध न करता उपाध्यक्ष आणि विश्वस्तपदाचा निर्णय पुढे ढकलण्यास संमती दिली. दरम्यान, बैठकीत परिषदेच्या कायदेशीर कामकाजासाठी ॲड. केदार सोमण यांची 2026 ते 2028 या कालावधीसाठी विधी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.

शंभराव्या संमेलनानिमित्त विशेष उपक्रम

आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परिषदेने एक उपक्रम हाती घेतला आहे. ‌‘नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी)‌’च्या सहकार्याने एका विशेष बसद्वारे महाराष्ट्रातील 99 ठिकाणी फिरते पुस्तक प्रदर्शन आणि एकदिवसीय संमेलन आयोजित केले जाणार आहे, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

बैठकीत परिषदेच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. परिषदेच्या वार्षिक ग््रांथ पुरस्कारांसाठी यंदा तब्बल 1200 पुस्तके प्राप्त झाली आहेत. 80 परीक्षकांचे मंडळ या पुस्तकांचे परीक्षण करत असून, 26 आणि 27 मे रोजी हे पुरस्कार प्रदान केले जातील. तसेच, सभासद नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर (सभासद माहिती पुनरावलोकन) प्रक्रिया राबवली जाणार आहे. परिषदेच्या आणि महामंडळाच्या कामाला सहकार्य म्हणून विविध क्षेत्रांतील व्यक्तींची एक सल्लागार समिती स्थापन केली जाणार आहे.
योगेश सोमण, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT