पुणे: महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची बहुचर्चित निवडणूक लवकरच होणार आहे. 27 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता टिळक रस्त्यावरील मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सर्वसाधारण सभेच्या काढलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेचे पत्र संस्थेच्या सर्व शाखांना पाठविण्यात आले आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक ही नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीबाबतचा प्रस्ताव मांडून मान्यता घेण्यात येणार आहे. ही सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विद्यमान कार्यकारिणी 2016 मध्ये निवडून आल्यानंतर 2021 मध्ये या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला.
मात्र, कोरोनाकाळात निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मतदानाने पाच वर्षांची मुदतवाढ घेतली होती. ती मुदतवाढ 31 मार्च 2026 ला संपणार आहे. त्यामुळे संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा प्रस्ताव मांडून त्यास सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत निवडणुकीबाबत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमच्या कार्यकारिणीची मुदत 31 मार्च 2026 ला संपत आहे. त्यामुळेच नियमांप्रमाणे आम्ही 27 सप्टेंबर रोजी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पंचवार्षिक निवडणुकीबाबतचा प्रस्ताव मांडून मान्यता घेणार आहोत. त्यामुळे निवडणूक ही होणारच आहे. सभेत मान्यता मिळाल्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करू. एखादी संस्था बरीच वर्षे चांगले काम करते किंवा ती कोणताही चांगला निर्णय घेत असेल, तर त्याला विरोध होतच असतो.- सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद