Maharashtra Sahitya Parishad Pudhari
पुणे

Maharashtra Sahitya Parishad: शंभराव्या साहित्य संमेलनापूर्वी मसापमध्ये सत्तांतर; अविश्वास ठराव मंजूर, सुनील महाजन नवे अध्यक्ष

Maharashtra Sahitya Parishad: शंभराव्या साहित्य संमेलनापूर्वीच महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तांतर; जुन्या पदाधिकाऱ्यांना धक्का, नव्या नेतृत्वाची निवड

Rahul Shelke

Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कारभारात मोठी उलथापालथ झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे मसापच्या नेतृत्वात बदल झाला असून अध्यक्षपदी सुनील महाजन, कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी, तर प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे यांची निवड करण्यात आली आहे.

मसापच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी कार्यकारी मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ठरावावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मसापच्या अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत कार्यकारी मंडळाने २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव मांडला होता. या ठरावावर स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी अशा एकूण २१ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराजी व्यक्त केली जात होती. प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कार्यकारी मंडळाच्या सदस्यांशी योग्य संवाद साधला जात नसल्याचा आरोप होता. तसेच कार्यकारी मंडळाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याची तक्रारही करण्यात आली होती.

आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि नांदी संमेलनांच्या आयोजनातील अनियमितता असे मुद्देही उपस्थित करण्यात आले होते. या सर्व कारणांमुळे पदाधिकाऱ्यांविरोधातील नाराजी वाढत गेली आणि अखेर अविश्वास ठराव मांडण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजवरच्या इतिहासात प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात अशा प्रकारे अविश्वास ठराव मांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना मसापमध्ये हा मोठा बदल झाला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर परिषदेतील नेतृत्व बदलल्याने साहित्य क्षेत्रात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मसापच्या कार्यकारी मंडळाची पुढील बैठक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत पुढील कामकाजाबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे आता साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. आगामी शंभरावे साहित्य संमेलन नव्या नेतृत्वाखाली कशा प्रकारे पार पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT