Action Against Hospital Pudhari
पुणे

Action Against Hospital: योजना न राबवणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई! आरोग्यमंत्र्यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या समविष्ट खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) योजनेची विभागीय आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक तसेच प्रशासक प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व जिल्ह्यांनी आपल्या पालकमंत्र्यांची वेळ घेऊन योजनांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिल्या. जिल्हा समन्वयक व क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून योजनांची माहिती द्यावी व सातत्याने समन्वय राखावा, असे आदेश त्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात किमान 100 किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन येणाऱ्या प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT