खडकवासला: उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय ड्रिपबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे. ड्रिपबॉल संघाचे नेतृत्व पुण्याच्या धायरी भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण, कु. प्रथमेश प्रशांत जाधव याने केले, ज्यामुळे धायरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मथुरा येथील ''रिअल इंटरनॅशनल स्कूल''च्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील १० राज्यांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. बास्केटबॉल, नेटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांचे मिश्रण असलेल्या या नाविन्यपूर्ण ''ड्रिपबॉल'' खेळात महाराष्ट्राच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि अंतिम फेरीत विजय मिळवून ''नॅशनल चॅम्पियन'' होण्याचा मान मिळवला.
यावेळी ड्रिपबॉल इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. अरविंद चित्तौडिया यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, "ड्रिपबॉल हा केवळ एक खेळ नसून तो युवकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. लवकरच या खेळाचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये केला जाईल." तसेच, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
एका सर्वसामान्य कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर भारतीय संघाचा कर्णधार बनलेल्या प्रथमेश जाधवचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशामुळे स्थानिक खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.