पुणे : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून मान्सूनची वाटचाल ठप्प झाली असून, वातावरणातील प्रतिकूल प्रणालींमुळे त्याची पुढील प्रगती खोळंबली आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावरील कमकुवत मान्सूनचा प्रवाह, वायव्येकडून येणारे उष्ण व कोरडे वारे आणि आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव, यामुळे राज्यात मान्सूनची प्रगती मंदावली आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास २३ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता आहे.
यंदा मान्सूनने राज्यात वेळेत प्रवेश केला असला, तरी ८ जूनच्या सुमारास दक्षिण कोकणातील हर्णाई आणि सोलापूर, बारामती परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची वाटचाल जवळपास थांबली आहे. गेल्या आठवडाभरात मान्सूनने महाराष्ट्रात विशेष प्रगती केलेली नाही. त्यामुळे शेती, पेरणी आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने चिंता वाढली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगडवर एक चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात २३ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या पुढे राहणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
२५ जून ते १ जुलै यादरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात चांगल्या स्वरूपाच्या मान्सून पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सह्याद्री ओलांडून मान्सून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात सक्रिय होऊ शकतो. या काळात अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यापूर्वी काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्वमोसमी सरी पडू शकतात.