पुणे

Monsoon Update : सावधान! रविवारपर्यंत मुसळधार कोसळणार, मान्सूनने महाराष्ट्र व्यापला

मुंबई, कोकणपट्ट्यात जोर‘धार’, सक्रिय झाल्यानंतर मान्सून सुसाट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मान्सूनने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्र व्‍यापला असून रविवार (दि. २८) पर्यंत राज्यात काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सूनने यंदा ९ दिवस विलंबाने महाराष्ट्र व्यापला. साधारणपणे १५ जूनच्या आसपास मान्सून राज्य व्यापत असतो. यासोबतच मान्सूनने गुजरात तसेच मध्य प्रदेशातही प्रवेश केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सूनला गती मिळाली आहे. २१ जूनपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून त्यानंतर तो सुसाट सुटला आहे. सक्रिय झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत त्याने राज्य व्यापले आहे. राज्यात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

राज्यात जोरदार पाऊस

राज्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस होत आहे. प्रामुख्याने मुंबई, कोकण, गोव्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी, नाशिक, जळगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा मारा अधिक होता. याशिवाय, राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नागारिक सुखावले आहेत.

दरम्यान, मान्सूनने बुधवारी उत्तर पूर्व अरबी समुद्राचा काही भाग, छत्तीसगड आणि झारखंडसह आणखी काही भाग व्यापला असून पुढील दोन ते तीन दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. सध्या सुरत, इंदूर, मंडला, दालटोलगंज, मोतिहारी अशी मान्सूनची रेषा आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय, कोकणातील सर्व जिल्हे, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यभर पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे.

पेरणीची घाई नको : कृषिमंत्री भरणे

राज्यात लांबलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. पावसाचा अंदाज आणि जमिनीत योग्य ओलावा (कमीत कमी ४ ते ५ इंच ओल) असल्याशिवाय पेरणी करू नये. घाईघाईने पेरणी केल्यास आणि पावसाने ओढ दिल्यास बियाणे उगवण्याची शक्यता कमी होऊन ‘दुबार पेरणी’चे संकट ओढावू शकते. त्यामुळे हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे मंत्री भरणे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT