Sports Marks Pudhari
पुणे

Sports Marks: नव्याने समाविष्ट 46 क्रीडाप्रकारांना मिळणार ‌‘क्रीडागुण‌’

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; क्रीडा संचालनालयाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नव्याने समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या 46 क्रीडाप्रकारांमधील खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात क्रीडा विभागाचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार राज्यातील 49 खेळप्रकारांना दहावी व बारावीच्या परीक्षेत क्रीडागुण देण्याची तरतूद आहे.

मात्र, गेल्या काही काळापासून विविध क्रीडा संघटनांकडून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांनासुद्धा ही सवलत मिळावी, अशी सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर, शासनाने सन 2025-26 मधील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती तातडीने मागवली आहे.

शासनाच्या या सकारात्मक पावलामुळे या खेळांमध्ये करीअर करणाऱ्या हजारो खेळाडू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. क्रीडागुणांची सवलत मिळाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढण्यास मदत होईल, ज्यामुळे क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी नवीन पिढीला अधिक प्रोत्साहन मिळेल.

आज सायंकाळपर्यंतची मुदत

या 46 क्रीडाप्रकारांच्या जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवरील स्पर्धांमध्ये किती खेळाडूंनी सहभाग घेतला, याची माहिती एका विशेष प्रपत्रात भरून आज शुक्रवारी (दि.22 मे) सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी क्रीडा संचालनालयाकडे ई-मेलद्वारे सादर करण्याचे निर्देश सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही माहिती गोळा करून ती पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवली जाणार आहे.

... या ‌‘46‌’ नव्या खेळांचा समावेश

क्रीडागुणांच्या सवलतीसाठी प्रस्तावित असलेल्या 46 खेळांमध्ये पारंपरिक भारतीय खेळांपासून ते आधुनिक मार्शल आर्ट्‌‍स आणि साहसी खेळांचा समावेश आहे. त्यामध्ये लगोरी, रस्सीखेच, लंगडी, म्युझिकल चेअर, रोप स्किपिंग, जंपरोप, टेनिसबॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेट, सुपर सेवन क्रिकेट, माँटेक्सबॉल क्रिकेट, कुडो, टेंग-सु- (टेंग-सु-डो), थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, सिलंबम, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, जित कुने दो, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ग््रॉपलिंग, बुडो, कलरीपयत्तू, गटका, आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, मिनीगोल्फ, वेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, फुटसाल, कॉर्पबॉल (कॉर्फवॉल), टेबल सॉकर, ड्रॉप रो बॉल, पेन्टाक्यू, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, शत्रांग मार्शल आर्ट, फुटबॉल टेनिस आणि स्पीडबॉल या खेळांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून 46 क्रीडाप्रकारांना शालेय क्रीडा गुण मिळावेत, अशी मागणी होत आहे. मंत्रालयातून याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. त्यादृष्टीने सर्व हालचाली सुरू असून, सर्व उपसंचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्याचा अहवाल तातडीने शासनाला सादर केला जाणार आहे.
- सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT