Market committee supervision fee Pudhari
पुणे

Market committee supervision fee: बाजार समित्यांच्या सचिव केडरचा मार्ग मोकळा; निधी जमा करण्यास मंजुरी

पणन संचालनालयात देखरेख शुल्क जमा करण्यास शासनाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून त्यांच्या बाजारातील किंवा बाजार क्षेत्रातील नियमनातील शेतीच्या उत्पन्नाच्या प्रति शंभर रुपये खरेदी किंमतीवर आकारण्यात येणारी पाच पैसे देखरेख शुल्काची रक्कम शासनाऐवजी पणन संचालक यांच्याकडे जमा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यासाठी पणन संचालनालयाच्या नावाने स्वीय प्रपंजी खाते (पीएलए/पीडीए) उघडण्यासही हिरवा कंदिल दाखविल्यामुळे बाजार समित्यांच्या सचिव केडरसाठीच्या निधीचा आणि ते केडर कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देखरेख शुल्कासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963, चे कलम 34 अ मधील बाजार समित्यांच्या आवारात होणाऱ्या कृषि उत्पन्नाच्या व्यवहारावर आकारण्यात येणारे देखरेख शुल्क राज्य शासनास देण्यात येईल, या मजकुराऐवजी संचालकांस देण्यात येईल, असा आवश्यक तो बदल करण्यात आला आहे.

शेतमाल व्यवहारातील या देखरेख शुल्कातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रस्तावित सचिव केडरमधील सचिवांचे वेतन व भत्ते, पणन संचालनालयातील सचिव केडर कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, सचिव केडरवर येणारा प्रशासकीय खर्च (उदा. कार्यालय भाडे, अभिलेख कक्ष, जाहिरात, संगणक, स्टेशनरी, फर्निचर, वीज, पाणी, दूरध्वनी, वायफाय कनेक्शन व अनुषंगिक खर्च) इत्यादी बाबींवर खर्च करण्यात यावा, असेही शासन निर्णयात म्हटलेले आहे.

त्यामुळे देखरेख शुल्काची रक्कम जमा होताच सचिव केडरही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याचे पणन संचालनालयातून सांगण्यात आले.

''राज्यात 305 कृषि उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. तर प्रत्यक्षात 158 ते 160 सचिव बाजार समित्यांवर कार्यरत आहेत. सुपरव्हिजन फी पणन संचालनालयात जमा होऊन गठित केडर खऱ्या अर्थाने सुरु होण्यासाठी स्वीय प्रपंजी खाते उघडण्यास दिलेल्या मान्यतेचे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेबद्दल आम्ही अभिनंदन करीत आहोत. कारण शेतकरी, बाजार समित्यांसह सचिवांसाठीही हा निर्णय दूरदृष्टीचा व पणन व्यवस्थेसाठी फायदेशिर आहे. यातून पणन संचालनालयाकडील सचिव केडरकडे राज्यांतून देखरेख शुल्कापोटी सुमारे 25 कोटींहून अधिक रक्कम जमा होईल आणि केडरवरुन सचिवांच्या नियुक् होण्यामुळे बाजार समिती कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी अपेक्षित आहे.
- दिलीप डेबरे , अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ,पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT