पुणे : राज्यात झालेल्या पाच जागांच्या अत्यंत चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत ‘मविआ’ने ३, तर महायुतीने २ जागा जिंकल्या. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन पदवीधर मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची सरशी झाली. नागपूर पदवीधरमधील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी बाजी मारली.
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी, तर पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या. ३६ तासांहून अधिक काळ मतमोजणी सुरू होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पराभव केला. येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक यांनी काँग्रेस उमेदवार आदिती पोहरे यांचा पराभव केला. नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी दुसर्या पसंतीच्या मतांवर प्रथम क्रमांक मिळवणार्या भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्यावर विजय मिळवला.
पुणे पदवीधरमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख आणि भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्यात जोरदार चुरस झाली. यात हर्षदा देशमुख विजयी ठरविण्यात आल्या. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत एकाही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पुढील फेऱ्यांची मतमोजणी करावी लागली. पदवीधर मतदारसंघात तब्बल १७,२९९ मते अवैध ठरली. यातील सुमारे ७० टक्के मते भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना मिळाल्याचे दिसून आले. विजयासाठी १,१३,११३ मतांचा कोटा निश्चित केलेला होता. अंतिम ४४ व्या फेरीनंतर हर्षदा देशमुख यांना १ लाख १३ हजार ८४० मते, तर डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मते मिळाली.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला मंगळवारी (दि. २७) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. पदवीधर मतदारसंघातील नोंदणीकृत ३,८८,०१९ पैकी २,४३,५२१ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ६२.७६ होती. दोन्ही मतदारसंघांत एकाही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा पूर्ण करता न आल्याने नियमानुसार मतमोजणीच्या पुढील फेऱ्या घेण्यात आल्या.
अवैध मतांनी निवडणूक फिरली
मतमोजणीवेळी वैध-अवैध मते १०० टेबलवर प्रमुख उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना दाखवली जातात. या प्रतिनिधींचा कानोसा घेतला असता विविध कारणांनी अवैध ठरलेली सर्वाधिक मते भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांची असल्याचे सांगण्यात आले. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत अवैध मतांमुळे निकाल फिरला, असे म्हणायला संधी आहे.