शंकर कवडे
पुणे: वस्तू अथवा सेवा विकत घेतल्यानंतर त्याचा दर्जा तसेच दिलेल्या सोयीसुविधांबाबत त्रुटी आढळल्यास त्याबाबत ग्राहक आयोगात धाव घेणार्यांमध्ये महाराष्ट्र सर्वांत पुढे आहे. ग्राहक आयोग अस्तित्वात आल्यानंतर आत्तापर्यंत राज्यातील आयोगामध्ये तब्बल तीन लाख 78 हजार 460 दावे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन लाख 91 हजार 466 दावे निकाली काढण्यात आले आहेत. आयोगातील दाव्यांची संख्या पाहता महाराष्ट्रातील ग्राहक फसवणूक झाल्यास आयोगात दाद मागण्याबाबत सर्वार्थाने जागरूक असल्याचे स्पष्ट होते.
अर्थव्यवस्था झपाट्याने बाजारकेंद्रित होत असताना ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटनासुद्धा वाढल्या. त्यानंतर ग्राहक संरक्षण ही काळाजी गरज झाली. ग्राहकाला जलदगतीने न्याय मिळवून ग्राहक हा राजाच राहायला हवा, या हेतूने केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये बदल केले.
नव्या बदलांसहित ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आला. सुरुवातीला ऑफलाइन स्वरूपात कामकाज चालणार्या आयोगाने ऑनलाइन कामकाज सुरू केल्यानंतर दाद मागणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेश, गुजरात तसेच कर्नाटक राज्यांत दाद मागणार्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते, अशी माहिती ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अॅड. महेंद्र दलालकर यांनी दिली.
या प्रकरणांत मागितली जातेय सर्वाधिक दाद
बँका, इन्शुरन्स कंपनी, रेल्वे, एअर सर्व्हिस, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स, टेलिकॉम, पोस्ट, विद्युत वितरण कंपनी, बिल्डर, वैद्यकीय सेवा, शिक्षण संस्था, सदोष विक्री, वस्तू विक्री याखेरीज शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहक आयोगाकडे धाव घेत आहेत.- अॅड. अजिंक्य मिरगळ, ग्राहक आयोगातील वकील
ग्राहकाला त्याच्या हक्काची तसेच अधिकाराची जाणीव होऊ लागल्याने ग्राहक आयोगात दाद मागण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील चार ते पाच वर्षांत दावा दाखल करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. कमी खर्चात जलद गतीने न्याय मिळत असल्याने नागरिकांमध्ये ग्राहक आयोगाचे एक वेगळे स्थान निर्माण होत आहे.- अॅड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, कन्झ्युमर अॅडव्होकेट असोसिएशन
राज्यातील ग्राहक सतर्क असल्याने देशात सर्वाधिक दावे हे महाराष्ट्रातून असल्याचे दिसून येते. आयोगाच्या विविध निकालांचा आधार घेत बहुतांश दावे दाखल होण्यापूर्वीच निकाली निघतात. ग्राहकांच्या हक्काचे रक्षण होणे हा एकमेव हेतू असतो. तो कायद्यामुळे साध्य होत असल्याने ग्राहक हाच सर्वार्थाने राजा आहे, हे अधोरेखित होते.- अॅड. अजिंक्य मिरगळ, ग्राहक आयोगातील वकील