पुणे : राज्याच्या भूमिअभिलेख विभागात लघुलेखक, भूकरमापक (सर्वेअर) यासह वेगवेगळ्या अशा एकूण 905 पदांसाठी भरती होणार आहे. ही पद भरती करण्यासाठी राज्य शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसूली विभागात रिक्त असलेल्या पदानुसार ही संख्या वाढविण्यात येणार आहे. (Latest Pune News)
राज्य शासनाचा भूमिअभिलेख विभाग महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. त्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात 1200 भूकरमापकांची पदभरती करण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे सुमारे 700 जणांनी नोकरीचा राजीनामा दिला.
त्यामुळे विविध महसूल विभागात कार्यरत असलेली भूकरमापकांची पदे रिक्त झाली. त्याचा परिणाम मोजण्यावर होऊ लागला. अनेक मोजण्या प्रलंबित राहू लागल्या.
ही बाब लक्षात घेऊन पुन्हा भूकरमापकांच्या भरतीसाठी भूमिअभिलेख विभागाच्या वतीने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव तत्वत: मान्य केला आहे. दरम्यान, या पदांबरोबरच लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) या पदांसाठीदेखील भरती करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
महसूल विभाग पदसंख्या
मुंबई 259
नाशिक 124
छत्रपती संभाजीनगर 210
अमरावती 117
नागपूर 112
एकूण 905
अशी आहे पदसंख्या
लघुलेखक (उच्चश्रेणी) - 2
लघुलेखक (निम्न श्रेणी) - 9