Admission Pudhari
पुणे

Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ; 1.57 लाख जागांपैकी फक्त 78 हजार अर्ज निश्चित

नोंदणी, अर्ज आणि शुल्क भरूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही; आयटीआय संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी २१ मे ते २१ जूनपर्यंत संधी देण्यात आली होती. राज्यभरातील १ लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी यंदा केवळ १ लाख ४२ हजार ८८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर १ लाख १८ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले. यातील १ लाख १४ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले; परंतु केवळ ७८ हजार ३४ विद्यार्थ्यांचेच अर्ज कन्फर्म झाले आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळेच उपलब्ध जागांच्या जवळपास तिप्पट म्हणजे साधारण तीन ते साडेतीन लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचे आढळून येते. परंतु, यंदा मात्र उपलब्ध जागांएवढी देखील नोंदणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा एकूण १ हजार ४ आयटीआय संस्थांमध्ये यंदा १ लाख ५७ हजार ६६४ जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. नोंदणी आणि शुल्कासह अर्ज करण्यासाठी २१ मे ते २१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली. तर पसंतीक्रम भरण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. येत्या २५ जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, तर २८ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्यामुळे आयटीआय संस्थांचे संस्थाचालक आणि प्राध्यापक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहेत.

आयटीआयचा टक्का का घटला?

यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही कागदपत्रांची सक्ती करण्यात आली आहे. डोमासाईलसारखे कागदपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे ते वेळेत उपलब्ध करणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. यांसह अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेश प्रक्रियेकडे कानाडोळा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॉप ट्रेडमधील जागा

  • इलेक्ट्रिशियन : २५ हजार १४०

  • फिटर : २३ हजार ४२०

  • वेल्डर : १७ हजार ३४०

  • कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट : १० हजार ८२४

  • मेकॅनिक डिझेल : ८ हजार ६४

  • वायरमन : ७ हजार २००

  • मोटार वाहन मेकॅनिक : ६ हजार ६९६

  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ४ हजार ६३२

  • ड्रेस मेकिंग : ४ हजार ४८०

  • टर्नर : ३ हजार ७२०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT