पुणे : शासनाचे जनजागृती कार्यक्रम आणि नानाविध उपक्रमांमुळे माता मृत्यूमध्ये कमालीची घट झाल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये माता मृत्यूचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. देशात केरळ पाठोपाठ सर्वांत कमी माता मृत्यू नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलेले एक लाख जन्मामागे 100 हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या तर 2030 पर्यंत 70 ते एक लाख जन्म हे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर देशाची वाटचाल सुरू आहे.
शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करणार्या राज्यांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 5 वरून 7 झाली आहे, यामध्ये केरळ (30), महाराष्ट्र (38), तेलंगणा (56), तामिळनाडू (58), आंध्रप्रदेश (58), झारखंड (61), आणि गुजरात (70) यांचा समावेश आहे. केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये माता मृत्यू दरात 15% पेक्षा जास्त घट झाली आहे.
मार्च 2022 मध्ये रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार, महाराष्ट्रात माता मृत्यूचे प्रमाण 2016-18 ला 46 वरून 2017-19 मध्ये 38 म्हणजेच 17 टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्याचा माता मृत्यूचा दर वीस वर्षांत तब्बल 75 टक्क्यांनी घटला आहे. 2001 मध्ये माता मृत्यूचा दर (प्रतिलाख प्रसूतीमागे होणारा मातांचा मृत्यू) 148 होता, तो आता 75 टक्क्यांनी घटून थेट 38 वर आला आहे.
कशामुळे घट?
जननी शिशुसुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गर्भवती आणि स्तनदा माता आणि मुलांसाठी पोषण अभियान या योजनांमुळे माता मृत्यू दरात घट झाली आहे.
शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे राज्यात माता मृत्यू दर लक्षणीयरीत्या घटला आहे. गर्भावस्थेतील काळजी, स्तनदा मातांना मार्गदर्शन, कुटुंबनियोजनाबाबत समुपदेशन आदींचा चांगला परिणाम पाहायला मिळत आहे.
– डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक, महाराष्ट्र
कालावधी महाराष्ट्र भारत
2001 ते 03 149 301
2004 ते 06 130 254
2007 ते 09 104 212
2010 ते 12 87 167
2013 ते 15 68 130
2016 ते 18 46 113
2019 ते 21 38 103