पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 92 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यात एकट्या सप्टेंबर महिन्यात 53.38 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. जमीन आणि पशुधनही पुरातील पाण्याने वाहून गेले असून, घरेही पडली आहेत. त्यापोटी आत्तापर्यंत बाधित शेतकऱ्यांना 2 हजार 250 कोटी रुपयांची मदत बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली. (Latest Pune News)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ते येथील अल्पबचत भवनात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे आज राज्यातील शेतकरी खूप अडचणीत आहे. जुने लोक सांगतात की, आमच्या आयुष्यात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही. वर्षाच्या सरासरीएवढा पाऊस एका दिवसात पडतोय. नुकसानग््रास्त भागात महसूल, ग््राामविकास आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, क्षेत्रीय स्तरावरून नुकसानीबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील आर्थिक मदत केली जाईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे योग्यवेळी निर्णय घेतील. अतिवृष्टीचे हे नैसर्गिक संकट असून त्याला सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी धीर धरावा, हताश होऊ नये, असे आवाहन करीत भरणे यांनी शासन शेतकऱ्यांवरील संकटसमयी बरोबर असून, अगदी एक ते पाच गुंठे क्षेत्रावरील नुकसानीचीही मदत करणार आहे. त्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.