पुणे : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट सुरूच असून रविवारी अकोला आणि अमरावतीत पारा 45.6 अंश सेल्सिअसवर गेला होता. दरम्यान, काही भागांत सायंकाळच्या वेळेस हलका पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. अकोला, अमरावतीत हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. अजून मे महिना पूर्ण बाकी असल्याने तापमानाचा पारा 47 ते 48 अंशांवर जाईल, असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, परभणीत एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला असून, यास अधिकत दुजोरा मिळाला नाही.
अकोला-अमरावती 45.6, वर्धा 45.5, ब्रह्मपुरी 44.1, यवतमाळ 43, पुणे 40.9, जळगाव 42, कोल्हापूर 38.2, महाबळेश्वर 33.3, मालेगाव 43.4, नाशिक 41.5, सांगली 40.2, सातारा 40.2, सोलापूर 42, धाराशिव 41, छत्रपती संभाजीनगर 41.8, परभणी 42.7, नांदेड 42.7, बुलडाणा 42.2, चंद्रपूर 44.2, गोंदिया 43.6, नागपूर 44.2, वाशिम 43, मुंबई 33.7, रत्नागिरी 36, डहाणू 36.6.