भिगवण: वर्षाच्या सरासरीएवढा पाऊस एकाच दिवशी पडत आहे. हे निसर्गाचे संकट आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना कशी मदत होईल, याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मे च्या शेवटच्या आठवड्यापासून ते आजपर्यंत पाऊस थांबायला तयार नाही. या महिन्यात सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यात झाले. सहा लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दुसऱ्या क्रमांकावर अहिल्यानगरचे नुकसान झाले. (Latest Pune News)
ज्यांचे ज्यांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, त्यांच्या पिकांचे पंचनामे केले जातील. ज्याची जमिनीची माती वाहून गेली आहे, पशुधन असेल किंवा फळबागांचे नुकसान झाले असेल, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
अद्यापही काही भागात पावसामुळे पंचनामे करण्याच्या अडचणी येत आहेत. अपूर्ण पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये देखील जास्त पाऊस पडला आहे. नांदेडमध्येदेखील मोठे नुकसान झाले आहे. अकोला, वाशिम, हिंगोलीचा दौरा पूर्ण केला आहे. विरोधकांकडून ओल्या दुष्काळाची मागणी होत असली तरी त्याबाबत काही अटी, नियम आहेत. त्याला अधीन राहून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे भरणे यांनी सांगितले.
राज्यातील शेतकरी आज खूप अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे व त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे भरणे यांनी सांगितले.