पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. त्यांनी सोमवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेत पूरग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती घेतली.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत अतिवृष्टी झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात बचावकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत ४ हजार ५६८ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २२ ठिकाणी दरडी कोसळल्या असून या दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉइंट यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.
इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उद्या देहू आणि त्यानंतर आळंदी येथून पालखीसोबत न येता वारकऱ्यांनी थेट पुण्यातून वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. वारकऱ्यांच्या निवास व इतर सोयींसाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.