MSEDCL Workers Strike
पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्यावतीने विविध मागण्याबरोबरच तीनही कंपन्यांचे खासगीकरणाचा शासनाने घातलेला घाट याच्या विरोधात कृती समितीच्यावतीने राज्यात 72 तासांचा संप पुकारण्यात आला होता. मात्र व्यवस्थापनाने कृती समितीतील संघटनांना केलेल्या आवाहनाचा आदर राखून तसेच 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी कृती समितीतील संघटना बरोबर वाटाघाटीची तारीख निश्चीत केली आहे. ही बाब लक्षात घेऊन कृती समितीने संप स्थगित केला आहे, असे कृती समितीने प्रसिध्दिपत्रकाव्दारे कळविले आहे.
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी,टोरेंटो इत्यादी खासगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध, महावितरण कंपनीत पुनर्रचना,कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्राचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, पारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे,वीज कर्मचार्यांना पेन्शन योजना लागू करणे, लाईन स्टॉप व इतर कर्मचार्यांचे कामाचे आठ तास निश्चित करणे, रिक्त पदे मागासवर्गीयाच्या आरक्षणासह भरणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे, पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचार्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृती समितीने तीन दिवसांचा संप पुकारला होता.
मात्र हा संप मागे घ्यावा यासाठी उर्जामंत्री,एम.एस.ई.बी.होल्डिंग कंपनीने, महाजन्को ,महावितरण, महाट्रान्स्को या विद्युत विभागातील कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी कृती समितीच्या सातही संघटनाच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. हीबाब लक्षात घेऊन कृती समितीने संप स्थगित केला आहे.