Maharashtra ST bus Pratap Sarnaik announcement
पुणे : महाराष्ट्राच्या परिवहन खात्यातील (एसटी) सर्व बसेस इलेक्ट्रीक करणार असून पुढील 10 वर्षात जुन्या एसटी बसेस टप्प्प्याने बंद केल्या जातील आणि त्या जागी नवीन बसेस येतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुण्यात केली. तसेच राज्यातील सर्व एसटी बस आणि डेपो अद्ययावत करण्याचे काम दोन महिन्यात सुरू होणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन सरनाईकांनी दिले.
प्रताप सरनाईक हे बुधवारी कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी एसटीच्या विकासाचा प्लानच मांडला. एसटी खात्यात 5 हजार बस घेणार असू तर त्यापैकी एक हजार बस या इलेक्ट्रिक घेण्याचे संकेत त्यांनी दिले. पुढील काही वर्षात एसटीच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील. 2029 पर्यंत ताफ्यात 25 हजार बसेस दाखल होणार आहेत, असं त्यांनी सांगितले.
स्मार्ट बसची वैशिष्ट्ये आणि सुरक्षा उपाययोजना
सरनाईक यांनी या स्मार्ट बसमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यंत्रणा असतील असे स्पष्ट केले. स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा बसमध्ये असावी, यावर त्यांनी भर दिला. आग किंवा इतर घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती आणि सुधारणा
एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा असून, यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षांत हळूहळू होतील असे त्यांनी स्पष्ट केले.
बसची मालकी आणि भविष्यातील योजना
बसेस लिझवर न देता, काही ठिकाणी त्या तयार करून घेतल्या जातील आणि त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच राहील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मी जुना सहकारी, अजितदादांकडून सढळ हस्ते निधी
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच शिंदेचे निकटवर्तीय आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यातून निवडून येणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. परिवहन खात्याला अजित पवार सढळ हाताने निधी देत आहेत. महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. कदाचित मी जुना सहकारी असल्याने निधीची अडचण येत नाही. इतर खात्यांबद्दल मला माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत कोणतीही नाराजी नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचा निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
पुण्यात भारतातील सर्वात मोठ्या कमर्शियल वाहन व रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीवरील 'कमर्शियल व्हेईकल फोरम 2025' परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेतही प्रताप सरनाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. सरनाईक यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ई-वाहन पॉलिसीवर प्रकाश टाकला. या पॉलिसीचा मुख्य उद्देश ई-वाहनांच्या उत्पादनाला चालना देणे, तसेच वापरकर्त्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. वाहन निर्मिती उद्योगांमध्ये महाराष्ट्राचे देशातील अग्रगण्य स्थान त्यांनी अधोरेखित केले.