पुणे

पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्‍याय मंडळाचा निर्णय धक्‍कादायक : उपमुख्‍यमंत्री फडणवीस

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुणे येथे पोर्शे कार अपघात प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आत्तापर्यंत काय घडले आणि काय कारवाई केली जाईल, याचा आढावा घेतला. या प्रकरणी बाल न्‍याय मंडळाचा निर्णय धक्‍कादायक आहे, अशी माहिती राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषदेत दिली.

पालकांनी मुलांना योग्‍य दिशा देणे गरजेचे

पुणे आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२१) पत्रकार परिषद घेतली, यावेळी फडणवीस म्‍हणाले, पुणे येथील अपघातात एका तरुण अणि तरुणीचा झालेला मृत्यू ही घटना अस्वस्थ करणारी आहे. अशा प्रकारच्‍या घटना टाळण्‍यासाठी पालकांनी मुलांना योग्‍य दिशा देणे गरजेचे आहे. आम्‍ही या घटेनची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दुर्लक्ष केलेले नाही. या प्रकरणी राजकीय आरोप करणे चुकीचे आहे. पोलिसांनी दाखल केलेल्‍या गुन्‍ह्यात योग्‍य कलमांचा वापर करण्‍यात आला आहे. मात्र बाल न्‍याय मंडळाचा निर्णय आमच्‍यासाठी धक्‍कादायक होता.

आरोपीवर प्रौढ म्हणून कारवाई केली जाणार

या प्रकरणातील आरोपीचे वय १७ वर्ष ८ महिने इतके आहे. तरी त्याच्यावर प्रौढ म्हणून कारवाई करावी अशी मागणी बाल बाल न्याय मंडळाकडे केली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालाचा हवाला देत आम्‍ही बाल न्‍याय मंडळाकडे पुन्‍हा याचिका दाखल केली आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे हा गुन्हा आहे. . त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना ज्यांनी दारु दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बार, पब नियमांच पालन करतात का याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT