पुणे : भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची अभूतपूर्व वाढ होत असल्याने आज महाराष्ट्र एका मोठ्या परिवर्तनीय संधीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्रास मिळावा, यासाठी दिनांक 18 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रस्ताव सादर केले आहेत. यात राज्याच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या शाश्वत वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीची रूपरेषा दिली आहे. अशी माहिती हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी दिली.
वंडेकर म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयाने मला कळवले आहे की, माझे प्रस्ताव मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत व त्यांनी ते पुढील कार्यवाहीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) संजय सेठी यांच्याकडे पाठविले आहेत. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतिशील नेतृत्वाखाली, या प्रस्तावांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाईल. देशात हवाई वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्र आपल्या आर्थिक विकासास चालना देण्याबरोबरच तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करू शकेल.
राज्यासाठी व्यापक नागरी विमान वाहतुक धोरण
देशाच्या व्हिजन 2040 शी सुसंगत असे भविष्यकालीन आणि व्यापक राज्य नागरी हवाई वाहतूक धोरण तयार करणे. ज्या मध्ये राज्याचा या क्षेत्रासाठीचा दृष्टिकोन, ध्येय आणि उद्दिष्टे मांडली जातील. असे धोरण ही काळाची गरज आहे व यामुळे महाराष्ट्राच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एक योग्य रोडमॅप तयार होईल.. याने या क्षेत्राच्या विकासाला चालना देताना शाश्वतता सुनिश्चित होईल, तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनुकूल व्यवसाय वातावरण निर्माण होईल.
महाराष्ट्राच्या नागरी हवाई वाहतूक विभागासाठी एक समर्पित वेबसाइट असणे गरजेचे आहे. या मुळे कामकाजातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. या वेबसाइटवर राज्यातील सर्व विमानतळ, लैंडिंग ग्राउंड, वॉटरड्रॉम्स, हेलिपोर्ट, विमान वाहतूक सुविधा, सेवा, प्रक्रिया, एमआरओ, एफटीओ इत्यादींची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. याची माहिती जगभरातून कोणीही एका क्लिक वर प्राप्त करू शकेल. यामुळे महाराष्ट्रात या उद्योगास चालना मिळेल.
ओझर व छत्रपती संभाजीनगर विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे हाताळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बर्याच काळा पासून उपलब्ध असल्या तरी या विमानतळांवरून अद्याप आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झालेली नाहीत. व्यापार, उद्योग, पर्यटन क्षेत्रांकडून अनेक वर्षांपासून होत असलेल्या या मागणीची पूर्तता होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. या बरोबरच शिर्डी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याची देखील मोठी मागणी आहे. या मागणीचा व भविष्यातील शिर्डी विमानतळाची मोठी क्षमता पाहता, एमएडीसीला या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून संबंधित खात्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना द्यावयास हव्यात.
अकोला, सोलापूर आणि रत्नागिरी येथील विमानतळ कार्यान्वित करून येथून उड्डाणे सुरू करण्यात यावी. अकोला विमानतळावर धावपट्टी विस्तारासाठी प्रलंबित जमीन अधिग्रहण प्राधान्याने करण्यात यावे. हवाई मार्गाने जोडले गेल्यास या प्रदेशच्या आर्थिक क्षमतेस मोठा वाव मिळेल व या भागातील पर्यटन, व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रास मोठी चालना मिळेल.
अमरावती, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांमध्ये हवाई वाहतुकीसाठी मोठी क्षमता आहे. गरज आहे ती हि विमानतळ आधुनिक, अद्यावत, जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी युक्त, दर्जेदार व स्पर्धात्मक करण्याची ज्यामुळे येथून शाश्वत हवाई वाहतूक सुनिश्चित होईल. यातील अनेक विमानतळ बर्याच वर्षांपासून विना वापर वा अल्प वापरली जात आहेत. ही विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेस व जनतेस मोठा उपयोग होईल. हे जलद होण्यासाठी सरकारने अश्या विमानतळांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून चालवण्याचा विचार करावयास हवा.