SSC HSC Combined Marksheet Certificate Pudhari
पुणे

Maharashtra Board New Certificate: राज्य मंडळाचा नवा निर्णय; मार्कशीट आणि प्रमाणपत्र आता एकत्रित

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी QR कोड, फोटो व होलोग्रामसह अत्याधुनिक प्रमाणपत्र प्रणाली लागू; 15 दिवसांत वितरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दुपारी 12 वाजताच ऑनलाइन निकाल जाहीर केला. यंदा विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुरक्षाकवच असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे. येत्या 15 दिवसांत विद्यार्थ्यांच्या हातात प्रमाणपत्र पडणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

कुलकर्णी म्हणाले की, बारावी परीक्षेसाठी प्रचलित पद्धतीने गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता या परीक्षेपासून गुणपत्रक व प्रमाणपत्र एकत्रित छपाई करून देण्यात येणार आहे. तसेच, प्रचलित पद्धतीमध्ये गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव छपाई करताना प्रथम आडनाव, विद्यार्थ्यांचे नाव व वडिलांचे नाव, याप्रमाणे छपाई करण्यात येत होती.

यंदाच्या परीक्षेपासून प्रथम विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव याप्रमाणे छपाई करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राच्या बॉर्डरमध्ये बाराखडी, गणितातील काही गोष्टी यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचा फोटो असणार आहे. क्यूआर कोड तसेच होलोग््रााम देखील छापण्यात येणार आहे. आधीच्या गुणपत्रिकांमध्ये 100 हून अधिक चुका होत्या. त्या सर्व चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळाच्या या अत्याधुनिक प्रमाणपत्राची कॉपी करणे किंवा दुबार प्रमाणपत्र बनवून फसवणूक करणे, यापुढे शक्य होणार नाही. यापूर्वी निकालानंतर मार्कशीट दहा दिवसांत मिळायची तर सर्टिफिकेट 6 महिन्यांनी मिळायचे. आता मात्र पहिल्यांदाच मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळेल; म्हणजे निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमार्फत प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल, असे देखील कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

राज्य मंडळाचे तीन कोटी रुपये वाचले

दहावी तसेच बारावीच्या दोन्ही परीक्षांचे दोन-दोन प्रमाणपत्रे यापूर्वी देण्यात येत होती. त्यामुळे राज्य मंडळाकडून कागदावर प्रचंड खर्च केला जात होता. यातून पर्यावरणाची हानी तर व्हायचीच, शिवाय राज्य मंडळाचे तब्बल दहा कोटी रुपये खर्च होत होते. मंडळाच्या या निर्णयाने दहा कोटींचे काम सात कोटी रुपयांमध्ये होणार असून, तब्बल 3 कोटी रुपयांची बचत नवीन प्रमाणपत्रामुळे झाल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

बालभारतीमध्ये प्रमाणपत्रांचे डिझाईन

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीमध्ये प्रमाणपत्रांच्या डिझाईनचे काम करण्यात आले. यामध्ये सलील वाघमारे या भाषातज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून, प्रमाणपत्राची रचना आणि त्यातील माहितीवर वाघमारे यांनी काम केले असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ही आहेत वैशिष्ट्‌‍ये...

  • दोन्ही प्रमाणपत्रांऐवजी एकीकृत प्रमाणपत्र.

  • आधार कार्ड किंवा अपार आयडीनुसार नाव लिहिण्याचा विशिष्ट क्रम.

  • नावाच्या क्रमात किंवा फोटोमध्ये काही त्रुटी असतील, तर त्या ऑनलाइन पद्धतीने त्वरित दुरुस्त करण्याची सुविधा.

  • डिजिटल स्वरूपात ‌’ई-मार्क्सशीट‌’ वेबसाईटवरून पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होणार.

  • कागदाचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत तसेच परीक्षेशी संबंधित कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT