बारामतीमध्ये काका-पुतण्यात लढत Pudhari
पुणे

Maharashtra Assembly Polls: बारामतीमध्ये काका-पुतण्यात लढत

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवारांविरूद्ध युगेेंद्र पवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सख्ख्या काका-पुतण्यात रंगतदार लढत होणार आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. या लढतीत काका भारी की पुतण्या वरचढ, याचे उत्तर 23 नोव्हेंबरच्या निवडणूक निकालातूनच स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये बारामतीबरोबरच पुण्यातील दोन उमेदवारांसह जिल्ह्यातील सहा उमेदवार घोषित केले आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे यांना, तर हडपसरमधून पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार चेतन तुपे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. तर, वडगाव शेरीतही पठारे यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) संभाव्य उमेदवाराचाही खरा कस लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील, शिरूर विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार, तर आंबेगाव मतदारसंघातून देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे आंबेगाव-शिरूर या मतदारसंघात सहकारमंत्री दिलीप वळसे विरुद्ध देवदत्त निकम, अशी गुरू-शिष्य लढत पाहायला मिळेल. जिल्ह्यातील सर्वांत चुरशीची लढत बारामतीत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले होते. या वेळी बारामतीकरांनी मोठ्या मताधिक्याने सुळे यांना विजयी केले होते.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेल्या जुन्नर, दौंड, खेड-आळंदी येथील जागांचा समावेश या यादीत झालेला नाही.

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित, मनसे आदी पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काही उमेदवारांनी तर आपले अर्जही दाखल केले आहेत.

इस्लामपूरमधून जयंत पाटील अहेरीत बाप-लेकीत सामना

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, घनसावंगीमधून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कराड उत्तरमधून माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, तर मुंब्रा-कळवामधून माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT