पुणे : पुढारी वृत्तसेवा : महावितरण व महापारेषण वीज कंपन्यांत 15 ते 20 वर्षे अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण व वयात सवलत न देताच प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. या भरतीच्या जाहिरातीची होळी वीज कंत्राटी संघटनेच्या वतीने करण्यात आली. महापारेषण कंपनीत 1903 व महावितरणमध्ये 5815 जागा अशा एकूण 7718 पदांची भरती काढून एवढ्या कामगारांना बेरोजगार करण्याचा घाट प्रशासनाने मांडला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने या भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिरातीची होळी करण्यात आली.
या वेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नीलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहुल बोडके, कार्याध्यक्ष अमर लोहार, जिल्हाध्यक्ष राहुल भालभर, मिलिंद कुडतरकर, जिल्हा सचिव प्रेमसागर देसाई, संघटनमंत्री जय माळी, उपाध्यक्ष व शेकडो कामगार उपस्थित होते.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने डिसेंबर 2014 पासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णाजी देसाई व कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने 22 एप्रिल 2015 रोजी कंत्राटदारविरहित पद्धतीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. त्यात मनोज रानडे समितीचा अहवाल आला. यात कंत्राटदारविरहित रोजगार व आरक्षण देण्याची शिफारस केली.
हेही वाचा