पुणे

पुण्यात महाविकास आघाडीचा 16 जूनला महामोर्चा; हे दिग्गज नेते होणार सहभागी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराची आणि प्रशासकराजमधील कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 16 जून रोजी महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

काँग्रेस भवन येथे सोमवारी शहरातील महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, दीप्ती चवधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेतील टेंडरराज चालवत आहेत. विशिष्ट ठेकेदाराला कामे दिली जात आहेत. भाजपच्या सत्ताकाळात काढण्यात आलेल्या निविदांमध्ये आणि कोविड काळात केलेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध महाविकास आघाडी 16 जून रोजी सकाळी 11.30 वाजता महामोर्चा काढणार आहे. हा महामोर्चा लाल महाल येथून महापालिकेवर जाणार आहे. महापालिकेसमोर या महामोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. या मोर्चात अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे सहभागी होणार असल्याचे तीनही पक्षाच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

SCROLL FOR NEXT