पुणे: उन्हाचा चटका वाढल्याने शहरात जागोजागी गुर्हाळे, सरबत विक्री करणारी दुकाने थाटली गेल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबांना मागणी होऊ लागली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात 15 ते 20 किलोच्या गोणीचे भाव 2, 500 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
मद्रास व हैदराबाद येथील शेतकर्यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला आहे. परराज्यातील लिंबे दर्जेदार असल्याने बाजारात मद्रास अन् हैदराबादी लिंबूचीच चलती आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांना मागणी होऊ लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लिंबे दाखल होतात.
मागील महिन्यात मार्केट यार्डात दररोज अडीच ते तीन हजार गोण्यांची आवक होत होती. या वेळी लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीला 400 ते 600 रुपये भाव मिळत होता. सध्या लिंबाची आवक दीड ते दोन हजार गोण्यांवर आली आहे.
परराज्याच्या तुलनेत स्थानिक लिंबू सरस
बाजारात जास्त रसदार असलेल्या स्थानिक लिंबांना सर्वाधिक मागणी आहे. स्थानिकच्या तुलनेत मद्रास व हैदराबाद येथील लिंबांमध्ये रसाचे प्रमाण कमी असते. घरगुती ग्राहक, सरबत विक्रेत्यांकडून स्थानिक तर उपाहारगृहे, गुर्हाळे यांच्याकडून परराज्यातील लिंबाची खरेदी करण्याकडे कल आहे. बाजारात मागणी अधिक असल्याने दर्जानुसार लिंबांना दर मिळत आहे.
उन्हाळ्यात लिंबाच्या झाडांना पाणी भरपूर लागते. पाणी चांगले मिळाले, तर उत्पादन चांगले हाती येते. परंतु, अनेक शेतकर्यांना उन्हाळ्यात पाणी कमी पडते. त्याचा परिणाम लिंबाच्या उत्पादनावर होऊन आवकेवर होतो. सध्या बाजारात लिंबाची आवक खूपच कमी असून, मागणी जास्त असल्याने दर चांगले आहेत. त्यामुळे हैदराबाद व मद्रास येथील शेतकर्यांची लिंबे बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे.- रोहन जाधव, लिंबू व्यापारी