वाल्हे: लम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या रोगामुळे आत्तापर्यंत अनेक जनावरे बाधित झाली आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात आठ जनावरे बाधित होती. उपचारानंतर यातील 6 जनावरे बरी झाली. अद्यापही 2 जनावरे बाधित असल्याची माहिती वाल्हे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माणिक बनगर यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील 32 हजारांपेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित पशुधनास लसीकरणाची कार्यवाही सुरू आहे. लम्पी आजारग्रस्त जनावरांची संख्या एकूण 442 आहे. उपचाराअंती बरे झालेली 336, तर 4 जनावरांचा मृत्यू झाला. (Latest Pune News)
उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. दवाखान्यात 14 हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यासोबतच त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील जवळपास 90 टक्क्यांपेक्षा अधिक जनावरांचे लम्पी लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी पुरंदर डॉ. अस्मिता सताळकर यांनी दिली. वाल्हे व परिसरात जवळपास 95 टक्के जनावरांचे लम्पी लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. बनगर यांनी दिली.
या करा उपाययोजना
शक्यतो बाहेरील जनावर आपल्या गोठ्यामध्ये आणू नका. इतर जनावरांमध्ये आपली जनावरे मिसळू देऊ नका. गोठ्यामध्ये कीटकनाशक फवारा. गोचीड व माश्यांचा बंदोबस्त करा. गोठा आणि परिसर स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्या. आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सध्या जनावरांची खरेदी-विक्री टाळावी, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माणिक बनगर यांनी केले.