LPG Cylinder Shortage Pune Pudhari
पुणे

LPG Cylinder Shortage Pune: प्रशासनाच्या ‌‘सगळं सुरळीत‌’ दाव्याचा भंडाफोड; गॅसटंचाईचा फटका

दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घरगुती गॅसटंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा प्रत्यक्षात किती फोल आहे, याचे ज्वलंत उदाहरण महंमदवाडीतील कृष्णानगर परिसरात समोर आले आहे. घरकाम करणाऱ्या सुरेखा गायकवाड यांच्या सात जणांच्या कुटुंबाला गेल्या वीस दिवसांपासून एलपीजी सिलिंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

प्रामुख्याने गायकवाड यांनी सिलिंडर संपल्यानंतर तत्काळ नवीन सिलिंडरची नोंदणी केली होती. मात्र, संबंधित गॅस एजन्सीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने अखेर त्यांनी घराबाहेर विटांची चूल तयार करून स्वयंपाक सुरू केला. मात्र, लाकूड गोळा करणे, धुरामुळे शेजाऱ्यांचा विरोध आणि उष्णतेत चूल पेटवण्याचा त्रास, यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

दरम्यान, प्रशासनाने एलपीजी वितरणासाठी ओटीपी प्रणाली लागू करून 96 तासांत सिलिंडर देण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. गॅसटंचाई नसल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांना अजून किती काळ अशा हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

पंधरा-पंधरा दिवस आम्हाला सिलिंडर मिळत नसल्याचे संगीता पाटील यांनी सांगितले. आम्ही कात्रज परिसरात राहतो. सिलिंडर बुक केला असला तरी आम्हाला गॅस मिळत नाही. मग प्रशासन कसले दावे करत आहे. गरिबांना रोजगारासाठी संघर्ष आधीच करावा लागत असताना आता नवा संघर्ष सुरू झाला आहे.

आजारी मुलीची अडचण

कुटुंबातील दीड वर्षाच्या आजारी मुलीची विशेष अडचण निर्माण झाली आहे. तिला वेळेवर अन्न देणे आवश्यक असताना चूल पेटवून स्वयंपाक करणे हे वेळखाऊ आणि अवघड ठरत आहे. अनेकदा रात्री उशिरा अन्न तयार करण्यात अडचणी येत असल्याने कुटुंबीयांवर उपाशी राहण्याची वेळही आली आहे. काही दिवस मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर गुजराण करण्याची वेळ गायकवाड कुटुंबावर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT