पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे आणि दिव्यांग मिळून 19 हजार 244 मतदार आहेत. परंतु यातील केवळ 302 मतदारांनी टपाली मतदानासाठी अर्ज भरून दिले आहेत. कसबा आणि चिंचवड विधासनसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे.
त्यात किती प्रमाणात यश मिळेल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, शारीरिक विकलांग नागरिक आदींना मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) टपाली मतदान करण्याची इच्छा असलेल्या मतदारांकडून 'नमुना 12-डी' अर्ज भरून घेतला आहे. त्यात 80 पेक्षा अधिक वय असणारे आणि दिव्यांग 19 हजार 244 मतदारांपैकी केवळ 304 मतदारांनीच अर्ज भरून दिले आहेत. त्यात चार दिव्यांग मतदार आहेत.
मतदारांचे स्थलांतर…
मतदार यादीनुसार मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचले. मात्र, यातील अनेक मतदार स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे टपाली मतदानाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.