सुपे येथील आठवडे बाजारामध्ये विविध जिल्ह्यांतून आलेल्या व्यापार्‍यांनी पोळा सणाच्या साहित्याची दुकाने थाटली होती. 
पुणे

सुपे आठवडे बाजारात उलाढाल कमी; व्यापार्‍यांनी बैलपोळ्यासाठी थाटली होती दुकाने

अमृता चौगुले

सुपे; पुढारी वृत्तसेवा: सुपे येथील आठवडे बाजारामध्ये बुधवारी (दि. 21) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या व्यापार्‍यांनी पोळा सणाच्या साहित्य विक्रीची दुकाने थाटली होती. मात्र, वाढलेले बाजारभाव, औद्योगिकीकरण, बैलांची संख्या घटल्याने उलाढाल कमी झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपदी पोळा साजरा केला जातो. बैलांना सजवूनरंगवून त्यांची वाजतगाजत गावातील मुख्य पेठेतून ग्रामदैवतांना मिरवणूक काढली जाते व परत घरी आल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा घास भरवला जातो. त्यांची पूजा केली जाते. मात्र, काळानुरूप औद्योगिकीकरण वाढल्याने या पोळा सणावर मर्यादा आल्या असल्या, तरी शेतकरीवर्ग हा सण उत्साहात साजरा करतात.

बुधवारी लाखो रुपयांची गुंतवणूक करून लातूर, परळी, मुंगीपैठण, अरण, माढा, मोडनिंब, राशीन, नांदगाव लोणार, पंढरपूर, औरंगाबाद, पैठण, मोहोळ या भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी सुपे येथे पोळा सणाचे साहित्य विक्रीसाठी आले होते. घुंगुरमाळा, गोंडे, सर, म्होरकी, वासरूपट्टा, गोफकंडे, शेंब्या, विविध रंग, हिंगुळ, रेशीम, सूत, नायलॉन, टायगर, बेगड आदी साहित्य व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आणले होते. मात्र, फॅन्सी प्रकाराला मागणी कमी झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

रेशीम 130 ते 140, सूत 100 ते 120, नायलॉन 180, गोफ 250 ते 300, टायगर 180 अशा भावाने विक्री केल्याचे भगवान मस्के (पंढरपूर ), विशाल शेंडगे (भांडगाव), माजीद शेख (औरंगाबाद), अर्जुन गायकवाड (टाकळी सिकंदर), तुकाराम चव्हाण (अरण), समाधान सुट्टे (लोणार), सागर देशमुख (अरण), विशाल पाटील (बार्शी) आदी व्यापार्‍यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैल, गायी सजविण्याच्या साहित्याच्या भावात वाढ झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना होत असलेल्या लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची मिरवणूक काढण्यावर शासनाकडून बंधने आल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT